Delhi Election Results 2025 Arvind Kejriwal Lost: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवतानाच दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. आपचा हुकुमी एक्का असलेले केजरीवाल पराभूत झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
केजरीवाल 12 व्या फेरीनंतरही पिछाडीवर होते. 12 फेऱ्यांनंतर ते 3 हजार मतांनी पिछाडीवर होते. मतमोजणीची शेवटची फेरीमध्ये केजरीवाल यांनी बरेच मतं भरुन काढली. मात्र शेवटच्या फेरीनंतरही भाजपाचे परवेश वर्मा यांनी 1200 मतांनी विजय मिळवला असून हा दिल्ली निवडणुकीमधील सर्वात मोठा उलटफेर असल्याचं मानलं जात आहे.
2013 च्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. याचाच भाग म्हणून राजधानी दिल्लीमध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळ सुरू झाली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर मिळून माजी सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. त्यावेळी आलेल्या मोदी लाटेत भाजपाला दिल्लीचे तख्त राखण्याची संधी होती. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. परिणामी दिल्लीतील मतदारांनी काँग्रेस आणि भाजपाला नाकारलं आणि ‘आप’च्या झोळीत भरभरून मतं टाकली.
2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लढणाऱ्या आम आदमी पार्टीने 28 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून शीला दीक्षित यांचा पराभव केला. काँग्रेसला केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले. दुसरीकडे हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने सर्वाधिक 31 जागांवर विजय मिळवला. परंतु, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीत सत्तास्थापन करताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली. परंतु, या कायद्याला विरोध करत काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी अवघ्या 49 दिवसांतच अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फेब्रुवारी 2015 पर्यंत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि 70 पैकी तब्बल 67 जागांवर विजय मिळवला. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा दिल्लीत सत्तास्थापना केली. भाजपाने पाच जागा जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यंदा मद्य घोटाळ्याबरोबरच इतरही अनेक विषयांमुळे आप समोर भाजपाने मोठं आव्हान निर्माण केलेलं. भाजपाचा आक्रमक प्रचारासमोर आपचा निभाव लागला नाही.
अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाले आहेत. जंगपुरा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. अवघ्या 600 मतांनी भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांनी सोसिदियांना पराभूत केलं आहे.