महाराजगंज : इच्छाशक्ती असेल तर मार्ग मिळतो असे म्हटले जाते, ही म्हण एका फ्रेंच कैद्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जेलमध्ये असलेल्या फ्रेंच कैद्याने आपल्या पत्नीसाठी माचिसच्या काड्यांपासून ताजमहल बनविला आहे.
यासाठी त्याला जेलच्या दोन कैद्यांनी मदत केली आहे. यासाठी ३० हजार माचिसच्या काड्या आणि दोन किलो फेव्हिकॉलचा वापर केला. हा ताजमहाल बनविण्यासाठी त्याला तीन महिन्याचा कालावधी लागला.
जिल्हा तुरूंग प्रशासनाने हा तयार झालेला माचिसच्या काड्यांचा ताजमहल सोमवारी पाहण्यासाठी खुला केला होता. तसेच तुरूंग प्रशासन हस्तकलेचा हा सुंदर नमुना त्या फ्रेंच कैद्याच्या पत्नीला नवीन वर्षाची भेट म्हणून फ्रान्सला पाठविणार आहे.
अल्बर्ट असे या कैद्याचे नाव असून तो एचआयव्ही पॉझिटीव्ह असून तो दुसऱ्या स्टेजचा पेशंट आहे. त्याची भाषा कोणाला समजत नसल्याने तो नेहमी शांत आणि निराश राहायचा. पण त्याने एकदा त्याची कला इतर कैद्यांना कॅनव्हासच्या माध्यमातून प्रथम दाखवली. त्यानंतर माचिसच्या काड्यांपासून ताजमहाल बनविण्याची इच्छा त्याने धीरेंद्र पटेल आणि मुनावर यांना बोलून दाखवली.
तुरूंग प्रशासनाने अल्बर्टची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्याला धीरेंद्र आणि मुनावर यांनीही मदत केली. हा ३० हजार काड्यांचा ताजमहाल बनल्यानंतर अल्बर्टने तो आपल्या पत्नीला फ्रान्सला पाठविण्याची विनंती केली. ती तुरूंग प्रशासनाने मान्य केल्याचे महाराजगंज तुरूंगाचे जेलर रणजीत सिंग यांनी सांगितले.