नवी दिल्ली : नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
भारतीय नागरिकांसोबत तब्बल साडेचारेश नागरिकांचे प्राण वाचवत त्यांना सुखरुप भारतात आणण्यात आलंय.. असं असलं तरी आजही हजारो भारतीय नागरिक नेपाळमध्ये अडकून पडलेत. यांत बिहारच्या नागरिकांचा मोठ्या संख्येनं समावेश आहे.. त्यांना आता ओढ लागलीय ती भारतात परतण्याची... दुसरीकडे कोच्चीचे शेकडो नागरिक नेपाळहून भारतात सुखरुप परतलेत..
महाराष्ट्रातून नेपाळमध्ये सोळाशे पर्यटक गेले होते. त्यापैकी १८५ पर्यटक परत आले असल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. व्यवस्था उपलब्ध होईल तसे सर्व परतीच्या मार्गावर असल्याचंही खडसेंनी सांगितलं.
नेपाळ भूकंपातल्या मृतांची संख्या ५ हजारापलिकडे पोहचलीय. तर जखमींचा आकडा १० हजारावर पोहचलाय. या भूकंपातला मृतांचा आकडा दहा हजारावर जाण्याची भिती वर्तवली जातेय. हजारो जखमी नागरिकांवर नेपाळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
दुसरीकडे एनडीआरएफच्या तेरा टीम्स दिवसरात्र मदत आणि बचावकार्यात गुंतल्यात. पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण होतायत. शिवाय या पावसामुळं नेपाळमध्ये रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.