नवी दिल्ली : हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. खुद्द माहिती आणि दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
गंगाजल घरपोच पोहोचवण्याची ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याबाबत विचार सुरु आहे, पोस्टानं हे गंगाजल घरपोच पाठवलं जाऊ शकतं, असंही रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत.
मोदी सरकारच्या या योजनेचा द्वारका शारदापीठाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. तर स्वामी अवीमुक्तेश्वरानंद यांनी मोदींना पत्र लिहून ही योजना अमलात आणू नये अशी मागणी केली आहे.
आपण गंगेला आई मानतो. तुम्ही स्वत: वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवताना मां गंगा ने मुझे बुलाया है असा नारा दिला होतात. आता तुमचाच एक मंत्री गंगाजल विकण्याची भाषा करत आहे. तुम्ही गंगेला आई म्हणाले असतानाच तुमचा मंत्री आईला विकायची भाषा करतोय, त्यामुळे हा निर्णय घेऊ नका, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.