www.24taas.com, झी मीडिया,कोलकाता
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या एका विक्रमवीराचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालाय. पश्चिम बंगालमध्ये होमगार्ड असलेले ४९ वर्षीय शैलेंद्रनाथ रॉय यांचा विश्वविक्रम करतानाच असंख्य समर्थकांसमक्षच मृत्यू झाला.
सिलीगुडीच्या तीस्ता नदीवरील ६०० फूट लांबीच्या तारेला शैलेंद्र यांनी आपल्या केसांनी गाठ मारत लटकत पुढे सरकण्याच्या स्टंटला सुरुवात केली खरी मात्र ७० फूटांवर असलेल्या शैलेंद्रनी ४० टक्के अंतर पार केल्यानंतर त्यांचे केस तारेत फसले आणि ते कोणतीही हालचाल करू शकले नाही. त्यांना हार्ट अटॅक आल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षकही हतबल झाले. काही क्षणातच शैलेंद्रच्या सगळ्या हालचाली बंद झाल्या आणि त्याच अवस्थेत ते जवळपास ४५ मिनिटं लोंबकळत होते. अखेर मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांच्या साह्यानं त्यांना खाली उतरवण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
शैलेंद्र यांनी याआधीही असाच विश्वविक्रम केला होता आणि आता ते स्वत:चाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला.