गोहाना, हरियाणा : दिवाळीच्या दिवसांत हरियाणाच्या एका पान विक्रेत्याला चांगलाच झटका बसलाय. राज्य सरकारच्या वीज विभागाकडून त्यांना तब्बल 132.29 करोड रुपयांचं बिल धाडलं गेलंय.
वीज मंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे ऐन दिवाळीत त्या पान विक्रेत्याला चालकाला चांगलाच 'शॉक' बसलाय. सोनिपतमधील एका गावात राजेश चौटाला यांची पानटपरी आहे. चौटाला यांना दरमहिन्याला साधारणतः ९०० रुपयांपर्यंतचे वीज बिल येते. मात्र, ऑक्टोबरमध्ये चौटाला यांच्या हाती चक्क १३२ कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, राजेश यांच्या दुकानात केवळ एक पंखा आणि एक बल्ब वापरला जातो. त्यामुळे, हे वीजबिल बघून चौटाला चक्रावून गेले आहे. आकड्यांसोबतच अक्षरीही तीच रक्कम लिहीलेली असल्याचे चौटाला यांनी म्हटलंय.
यानंतर, उत्तर हरियाणा वीज वितरण निगमनं (यूएचबीवीएन), एका पान विक्रेत्याला 132 करोड रुपयांचं बील पाठवणं ही खूप मोठी चूक झालीय, असं कबूल केलंय. हे बील ऑनलाईन तयार केले जातात. सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही चूक झाल्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलंय. राजेश यांचं योग्य बील 1,668 रुपये असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.