बंगळुर : भारताच्या मंगळयानाने आपल्या कॅमेऱ्यातून मंगळ ग्रहाची पाच छायाचित्र पाठविली आहेत. या हाय डेफिनेशन फोटोत लाल भडक ग्रह नजरेत भरत आहे. ही छायाचित्र इस्त्रो लवकर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक फोटो इस्त्रोने ट्विटर अपलो़ड केलाय.
पहिल्याच प्रयत्नात आणि अत्यंत कमी खर्चात यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत आपलं यान स्थापित करण्याचं प्रचंड अवघड कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पार पाडल्यानंतर. लगेचच मंगळयानाने आपल्या कार्यास सुरूवात केली आहे. आणि याचाच भाग म्हणून मार्स ऑर्बिटर अर्थात मंगळयानाने पहिला फोटो काढला आहे.
तब्बल ७ हजार तिनशे किलोमीटर उंचीवरून आणि ३७६ मीटर स्पार्टिकल रेझोल्युशनचा हा फोटो मंगळयानाने काढला आहे. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर साईटवर मंगळाचा पहिला फोटो टाकल्यानंतर लाखो भारतीयांनी इस्रोवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
1st image of Mars, from a height of 7300 km; with 376m spatial resolution. MT @MarsOrbiter The view is nice up here. pic.twitter.com/RbqmnSyyFp
— ISRO (@isro) September 25, 2014
२४ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ७.४५ मिनिटांनी भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि भारतीय शास्त्रज्ञांनी नवा इतिहास लिहिला. अमेरिका, रशिया, जपान, चीन या महासत्तांना जी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात साध्य झाली नाही, ती गोष्ट भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य केली अन् प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा आशियातील पहिलाच देश ठरला आहे. या यशामुळे अवकाश क्षेत्रातील नवी ताकद म्हणून भारत पुढे आला आहे.
भारताच्या मंगळ मोहिमेची सुरुवात गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी झाली होती. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) पृथ्वीभोवती २५० किलोमीटर बाय२३ हजार ५५० किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आले. मंगळाला गवसणी घालण्याचा हा पहिला टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) लीलया पार केला.
सुमारे ३०० दिवसांच्या प्रवासानंतर व सुमारे सहा कोटी किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर बुधवारी सकाळी वेग कमी करून योग्य कक्षेत नेण्यासाठी मंगळ यानाचे इंजिन ७ वाजून १७ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.