श्रीहरीकोटा : इस्त्रोने आज उत्तुंग यश संपादन केले. पाऊल पडते पुढे, याचा प्रत्यय इस्त्रोने दाखवून दिला. पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ हे अवकाशयान अवकाशात झेपावले आणि शास्त्रज्ञांनी आनंदोत्सव साजरा केला. इस्त्रोची ही सर्वात मोठी वाणिज्य मोहीम आहे.
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज होते. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण केले. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडलेत. इस्त्रोच्या श्रीहरीकोट्यातल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून हे उड्डाण झाले.
या उपग्राहांचं वजन तब्बल १ हजार ४०० किलोहून जास्त होते. इस्त्रोनं आतापर्यंत सोडलेल्या ३८ आंतराष्ट्रीय उपग्रहांपैकी हा पाच उपग्रहांचा संच सर्वात वजनदार होता. हे पाचही उपग्रह इस्त्रोच्या व्यावसायिक यशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे मानले जात होते. याला यशही आले.
जगात फक्त सहा देशांकडे भूस्थिर कक्षेत उपग्रह सोडण्याचं तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. आजचं प्रक्षेपण यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या शिरपेचा नवा तुरा खोवला गेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.