किंगफिशरचे ओझे, महिलेची आत्महत्या

डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2012, 12:21 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.
सुश्मिता चक्रवर्ती असं या महिलेचं नाव असून तिचे पती मानस चक्रवर्ती किंगफिशरमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करतात. इतर कर्मचा-यांप्रमाणे मानस यांचा पगारही गेल्या अनेक महिन्यांपासून झालेला नाही. त्यामुळे चक्रवर्ती कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडलं होतं.
आत्महत्येपूर्वी सुश्मिता यांनी चिठ्ठी लिहली होती. त्यात पतीचा पगार न झाल्यानं घर चालवणं कठीण होऊन बसल्याचं त्यांनी लिहलं होतं. एकूणच किंगफिशरमधील मंदी आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आत्महत्येसाठीही कारणीभूत ठरू लागलीय.
किंगफिशरमधल्या आर्थिक संकटामुळे कर्मचा-याच्या पत्नीला आत्महत्या करावी लागते, ही घटना दुर्दैवी असल्याचं नागरी हवाई वाहतुकमंत्री अजित सिंग यांनी म्हटलंय. मात्र त्याच वेळी किंगफिशर एअरलाईन्स जोवर अटींची पूर्तता करत नाही, तोवर त्यांना उड्डाणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. विमानांची सुरक्षा आणि उड्डाणांचं वेळापत्रक पाळण्याबाबतच्या या अटी आहेत.