अपहरण केलेल्या काँग्रेस नेत्याची मुलासह हत्या

नक्षलवादी हल्लानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2013, 08:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला करत १९ जणांना ठार केले. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हल्लानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्षलवादी चळवळीचे अत्यंत हिंसक व भीषण रूप छत्तीसगडमध्ये शनिवारी दिसले. काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नेते आणि `सलवा जुडूम`चे प्रणेते महेंद्र कर्मा हे जागीच ठार झाले; तर माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचे अपहरणही केले होते.

छत्तीसगडमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री रमणसिंह यांनी `विकास यात्रा` काढली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने `परिवर्तन यात्रा` काढली. शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही यात्रा जगदलपूर जिल्ह्यातील दर्बगटी खोऱ्यात पोहोचली होती. तेथील सुकमा येथील सभा आटोपून २० वाहनांचा ताफा जगदलपूरकडे जात असताना गिदम घाट येथे दबा धरून बसलेल्या सुमारे १५० सशस्त्र नक्षलवाद्यांनी या यात्रेवर जोरदार हल्ला केला. बेछूट गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यामुळे यात्रेतील सहभागींमध्ये गोंधळ उडाला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.