www.24taas.com , झी मीडिया, हैदराबाद
हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी “काँग्रेस फक्त मतांचं राजकारण करतंय”या शब्दात केंद्र सरकार आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली.
नरेंद्र मोदींना आपल्या भाषणाची सुरुवात तेलुगू भाषेतून केली आणि उपस्थितांची मनं जिंकली. त्यानंतर ५ रु. तिकीट भरुन भाषणाला आल्याबाबत मोदींनी आंध्रप्रदेशच्या नागरिकांचे आभार व्यक्त केले. आंध्र भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी सभेसाठी ५ रु. आकारल्यामुळं वाद निर्माण झाला होता. मात्र ही रक्कम उत्तराखंडच्या पीडितांसाठी आहे, असं सांगत मोदींनी भाजप युवा कार्यकर्त्यांच्या या कामगिरीचं कौतूक केलं.
मागील आठवड्यात पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानं व्यथित झाल्याचं सांगत. मोदींनी केंद्र सरकारवर तोफ डागली. सीमाभागांचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं मोदी म्हणाले. सरकार देशाला सुरक्षा देऊ शकत नाही असं म्हणत, मागील वर्षी जानेवारीत पाकिस्तानी सैन्यानं आपल्या दोन जवानांचं डोकं कापलं होतं. त्यावेळी अशा घटना सरकार सहन करणार नाही, हे पंतप्रधान बोलले होते. मात्र आता काय झालं? सरकार गप्प का? असा सवालही नरेंद्र मोदींनी उपस्थित केला. पूंछमध्ये जवानांवर झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हत्येबाबत सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न मोदींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना विचारला.
सीमाभागातल्या सुरक्षेबाबत सरकारच्या धोरणांवर मोदींनी कडाडून टीका केली. भारताच्या सीमाभागात चीनची घुसखोरी वारंवार होते, मात्र सरकार ही घुसखोरी थांबविण्यासाठी काहीच करत नसल्याची टीका मोदींनी केली.
जम्मू एअरपोर्टवर भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना अडवल्याबद्दलही मोदींनी सरकारवर हल्लाबोल केला. किश्तवाडमधील घटनेत कट असल्याचा संशय येतोय असं म्हणत सरकारनं खरेपणा लपवण्यासाठी जेटलींना अडवलं का? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.