www.24taas.com,नवी दिल्ली
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळाला आहे. तर अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेतच नसल्याचे दिलेले स्पष्टीकरण यामुळे मार्गातील अडसर दूर झालाय.
भाजपच्या अध्यक्षपदाची निवड येत्या २३ जानेवारीला होणार आहे. गडकरी यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण होत असून त्यांना अध्यक्षपदाची आणखी एक टर्म मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पक्षातील काही विरोधकांनी गडकरींना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळू नये म्हणून हालचाली सुरू केल्या होत्या.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीत सुषमा स्वराज यांचेही नाव घेतले. त्यामुळे गडकरी यांच्यासमोरील समस्या वाढल्या परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यातच सुषमा स्वराज यांनीही आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नसल्याचे जाहीर केले.
भाजपचे काही नेते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही नाव अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घेत होते; मात्र आडवाणी यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा नव्हता. त्यातच मोदींनीही आपण या निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितल्याने गडकरींचा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
भाजपने काढलेल्या अधिसूचनेनुसार अध्यक्षाच्या निवडीसाठी येत्या २३ जानेवारीला सकाळी १० ते ११.३० या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यांची छाननीही त्याच दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येईल. एकपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज आल्यास निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येईल.