www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.
नितीशकुमार यांनी १२६ मतांसह विश्वाकसदर्शक ठराव जिंकून बहुमत सिद्ध केले. या मतदानावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी बहिष्कार टाकला. नितीश कुमारांच्या विरोधात फक्त २४ मते पडली. सरकार तारण्यासाठी नितीशकुमार यांच्या सरकारला लोक जनशक्ती पक्षाच्या एका आमदाराने पाठिंबा जाहीर केला होता.
भाजप आणि `जेडीयू`मध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळातून भाजपच्या ११ मंत्र्यांना निलंबित केले होते. त्यामुळे सरकारला विश्वाजसदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार होते. नितीशकुमार यांच्या बाजूने काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) आणि काही अपक्ष आमदारांनी मतदान केले.
बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेत `जेडीयू`चे ११८, भाजप ९१, राजद २२, काँग्रेस ४, सीपीआय १, लोजप १ आणि अपक्ष ६ असे बलाबल आहे. `जेडीयू`ला बहुमतासाठी चार मतांची गरज होती. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक केल्यानंतर काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्याता वर्तविली जात होती आणि तसचं झालं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.