मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू

फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.  

Updated: Apr 18, 2015, 06:27 PM IST
मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू  title=

श्रीनगर: फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय. नारबल इथं फुटीरतावाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला असता निदर्शकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, आंदोनकर्त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारा फुटीरतावादी नेते मसरत आलम याच्याविरोधात कलम 124 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसरत आलमला अटक करून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

या निर्णयाच्या निषेधार्थ काश्मीरमधील नारबल इथं काही आंदोलनकर्त्यांनी निदर्शनं केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असता एक जण जखमी झाला, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तणावाचं वाचावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दरम्यान शुक्रवारी मसरत आलमच्या अटकेनंतर श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शनं केली होती. आंदोलनाचं केंद्र असलेल्या त्राल परिसर आणि श्रीनगरमध्ये निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अश्रू धुराचा मारा केला. यात डझनावर लोक आणि दोन पोलीस जखमी झालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.