www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थानमध्ये आज विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान सुरू झालंय. सव्वा चार कोटी मतदार २०८७ उमेदवारांचं भवितव्य आज ठरवतील. निवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप यांच्या सरळ लढत होत आहे. राजस्थानमध्ये मतदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान सुरू आहेत. यंदा राजस्थानमध्ये तब्बल ४५ लाख नवीन मतदार आहेत. त्यामुळे नवीन मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच रस्त्यांवर उतरून जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
‘बदल हवाय तर मतदान करा...’ असा नारा राजस्थानमध्ये ठिकठिकाणी दिला जातोय. छत्तीगड आणि मध्यप्रदेशमध्ये मतदानाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून राजस्थानच्या जनतेत मतदानापूर्वी चैतन्य निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसतंय. जयपूर शहरात शाळा - कॉलेजेसच्या तीन हजार विद्यार्थ्यांनी रॅली काढून मतदान करण्याचं आवाहन केलं. राजस्थानमध्ये मतदानाच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी रॅली काढली जात आहे. रस्त्याच्या कडेला पोस्टर घेऊन मतदानाचं आवाहन केलं जातंय. शाळेचे विद्यार्थी घरोघरी जाऊन अक्षता देत मतदानाचं निमंत्रण देण्याचा अभिनव अभियानही छेडलंय. अशा अनेक मार्गांनी जनतेत जनजागृती पसरवण्याचं काम राजस्थानात सुरू आहे.
राजस्थानमध्ये ४ कोटी ८ लाख २९ हजार मतदार आहेत. यात २ कोटी १५ लाख २२ पुरूष मतदार आहेत. तर एक कोटी ९३ लाख सात हजार महिला मतदार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा ४५.५६ लाख नवीन मतदारांचा समावेश आहे. यात १८ ते १९ वयोगटातले १५ लाख मतदार आहेत. त्यामुळं नवीन मतदारांचा कौल लक्षवेधी ठरणार आहे. १९९३ पासून दर पाच वर्षांनी राजस्थानात सत्ता बदल होतोय. मतदानाचा विचार केला तर २००३ मध्ये ६७ टक्के मतदान झालं होतं. वाढलेल्या मतदानाचा कौल भाजपला मिळाला होता आणि काँग्रेस सत्तेबाहेर गेली होती. २००८ मध्ये पुन्हा ६५ टक्के मतदान झालं आणि सत्तारुढ भाजपला बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसची सत्ता आली. जास्त मतदान म्हणजे प्रस्थापितांविरोधातील लाट असं राजस्थानचा इतिहास आहे. त्यामुळं राजस्थाननं जर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा कित्ता गिरवला तर सत्ता पालटण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.