नवी दिल्ली : रावण आणि हिटलर हे दोघेही समकालीन नव्हते... दोघेही वेगवेगळ्या देशांचे... पण या दोघांमधलं साम्य म्हणजे संसदेनं दोघांनाही असंसदीय ठरवलंय.... आणि आता या रावण आणि हिटलरच्या पंक्तीत आणखी एका नावाचा समावेश झालाय... ते म्हणजे गोडसे...
या यादीत गोडसेंचं नाव घ्यायचं कारण म्हणजे आता चक्क संसदेनंच 'गोडसे' या नावाला या यादीत आणून बसवलंय. 'गोडसे' हा शब्दच असंसदीय असल्याचे निर्देश राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दिलेत.
त्याचं झालं असं की, गेल्या आठवड्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. राजीव यांनी राज्यसभेत नथुराम गोडसेच्या पुतळ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यांनी जेव्हा सचिवालयाकडून आपल्या भाषणाची प्रत मिळवली, तेव्हा त्यातून 'गोडसे' हा शब्द वगळण्यात आलेला होता. पी. राजीव यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा मांडला. तेव्हा 'गोडसे' हा शब्द असंसदीय असल्यानं तो वगळण्यात आल्याचा खुलासा राज्यसभा उपाध्यक्ष कुरियन यांनी केला...
पण, या सगळ्याची शिक्षा भोगावी लागतेय ती खासदार हेमंत गोडसे यांना... कारण त्यांच्या आडनावातच 'गोडसे' हा शब्द आहे. त्यामुळे, मात्र त्यांची चांगलीच गोची झालीय. लोकसभेत अगदी अध्यक्षांनी जरी त्यांच्या नावाचा पुकारा केला, तरी अधिकृत कामकाजामधून 'गोडसे' हे नाव वगळावं लागणार आहे. त्यामुळे खासदार गोडसेंची प्रचंड कोंडी झालीय.
'नथुराम गोडसे' ही एक प्रवृत्ती आहे.... याचा अर्थ 'गोडसे' आडनावाच्या सगळ्यांना असंसदीय ठरवणं अत्यंत चुकीचं आहे. गांधीजींचा खून करणाऱ्या नथुरामला फाशीही झाली.... मग आता चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यानं काय साधणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.