www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.
इंग्रजी मासिक कॅरावाननं त्याची मुलाखत घेतलीय. या मुलाखतीत असिमानंदनं मोहन भागवतांवर हे आरोप केलेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं असिमानंदचे सर्व आरोप फेटाळलेत. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप होत असल्याचं स्पष्टीकरण रा. स्व. संघाकडून करण्यात आलेत.
असिमानंद सध्या अंबाला जेलमध्ये आहे. २००६ ते २००८ या दोन वर्षाच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये ११९ लोकांचा बळी गेला. या स्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत स्वामी असिमानंदसह काही जणांना अटकही करण्यात आली आहे.
सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत हे संघाचे सरचिटणीस असताना असिमानंद, इंद्रेश कुमार आणि सुनील जोशी हे भेटायला गेले. त्यांनी काही तरी धमाका केला पाहिजे अशी कल्पना भागवत यांच्यासमोर मांडली आणि भागवतांनी त्याला संमतीही दिली. त्यानुसार मग स्फोट घडवले गेल्याचं असिमानंदनं कॅरावानाच्या मुलाखतीत म्हटलंय.
तर दुसरीकडे कॅरावननं जी मुलाखत छापली आहे, ती खोटी असल्याचा दावा असिमानंदांचे वकिल जे. एस. राणा यांनी केला आहे. मी असिमानंदांच्या विधानांची सत्यता पडताळूनच हे विधान करत आहे, असंही राणांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.