www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बुधवारी रुपयांला डॉलरच्या तुलनेत आणखी मोठा धक्का बसलाय. रुपयाच्या तुलनेत मंगळवारीच सर्वात खालची पातळी गाठलेल्या रुपयानं आज त्याहूनही खालची पातळी गाठलीय. आज बाजार उघडताच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११८ पैशांनी रुपया कोसळला. बाजार उघडताच एका डॉलरसाठी तब्बल ६७.४२ पैसे मोजावे लागत होते... त्यानंतर थोड्याच वेळात रुपयानं ६८ चा अंकही पार केलाय. हा रुपयांचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा निचांक आहे.
रुपयाच्या दराचं अवमुल्यन मंगळवारीही दिसून आलं होतं... त्यामुळे कोसळलेल्या बाजारात चिंतेचं वातावरण पसरलंय. मंदीचं सावट असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
आयातदारांकडून डॉलरला असलेली वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्थितीमुळे रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरतंय. ही घसरण कधी थांबणार, याची चिंता आता गुंतवणूकदारांना सतावतेय. सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न अपूरे पडत असल्यामुळे गुंतवणुकदार नाराज आहेत. परिणामी शेअर बाजारात काल सकाळपासून मंदीचं वातावरण होतं. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ५९० अंशांची तर निफ्टीमध्ये १९० अंशांची घसरण झाली.
महसुली तुटीमुळे रुपयाचं सातत्यानं अवमुल्यन होत असताना तूट कमी करण्यासाठी ५०० टन सोनं गहाण टाकलं जाऊ शकतं, असे संकेत वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी दिलेत. दरम्यान, सोन्याच्या दरानं दीड हजारांनी उडी घेत ३३ हजारांचा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला आहे. शुद्ध सोन्याचा दर ३३ हजार ५०९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर चांदीच्या दरातही किलोमागे सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.