१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजारांचं बक्षिस

दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.

Updated: Oct 26, 2014, 04:32 PM IST
१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजारांचं बक्षिस   title=

लखनऊ: दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपाच्या लव्ह जिहादनंतर आता शिवसेनेनं मोठ्या हिंदू कुटुंबांना प्रशस्तीपत्रक आणि २१ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 'राष्ट्र हितासाठी हिंदुंची संख्या वाढावी' यासाठी ही मोहीम राबवणार असल्याचं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे. 'बहुसंख्य हिंदू कुटुंबनियोजनाला प्राधान्य देत असले तरी अन्य धर्मांमध्ये कुटुंबनियोजनाला फारसं महत्त्व दिलं जात नसल्यानं अन्य धर्मीयांची लोकसंख्या दिवसांगणिक वाढत आहे. त्यामुळं हिंदूंची लोकसंख्या वाढवणं ही काळाची गरज आहे असं अनिल सिंह यांनी सांगितलं. 

कुटुंब नियोजनाचा निषेध म्हणून १ नोव्हेंबररोजी उत्तरप्रदेशमधील आरोग्य केंद्रांना टाळं ठोकून आंदोलन करणार असल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलं. तसंच नोव्हेंबर अखेरीस १० पेक्षा अधिक मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाना २१ हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करु असंही त्यांनी नमूद केलं. सात वर्षांपूर्वीही शिवसेनेनं उत्तरप्रदेशमध्ये हा कार्यक्रम राबवला होता अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 

दरम्यान, शिवसेनेच्या या घोषणेनंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवसेना हिंदू - मुस्लीमांमध्ये तणाव करुन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याची टीका काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी केली आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेचा हा कार्यक्रम लोकशाहीविरोधी असल्याचं म्हटलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.