लैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.

Updated: Dec 7, 2014, 09:58 PM IST
लैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण title=
प्रातिनिधिक फोटो

रायपूर : छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.

नक्षलवाद्यांच्या टोळीत वारंवार लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागल्यानं कंटाळून यातील महिलांनी आत्मसमर्पण केल्याचं म्हटलंय. नक्षलवादी महिला उर्मिला वटी हिच्यावर तब्बल आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आत्मसमर्पण केल्यानंतर उर्मिलानं आपण नक्षलवाद्यांच्या सहा नंबर कंपनीची सदस्य असल्याचं सांगितलं. उर्मिला १४ वर्षांची असताना दबाव टाकून नक्षलवाद्यांनी तिला आपल्या गँगमध्ये सहभागी करून घेतलं होतं. इथं तिला वारंवार लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं. यामुळेच वैतागलेल्या उर्मिलानं आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. 

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये राजबटी (३० वर्ष) हिच्यावर ५ लाख रुपये, फूलों (२२ वर्ष) हिच्यावर आठ लाख रुपये तर मैनू (२६ वर्ष) आणि गुड्डू (२४ वर्ष) यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळे नक्षलवादी गेल्या काही काळापासून सतत पोलिसांच्या संपर्कात होते. आंध्रप्रदेशचे नक्षली नेते छत्तीसगड कॅडरच्या नक्षलवाद्यांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करत असल्याचं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना सरकारच्या योजनेचा फायदा देत त्यांचं पुनर्वसन करण्यात मदत केली जाईल.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.