www.24taas.com, नवी दिल्ली
५०० कोटींना फसवणाऱ्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. या जोडप्यानं एक बोगस कंपनी स्थापन करुन, पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिष दाखवून साधारण दोन लाख लोकांना फसवलंय. हे जोडपं मूळचं नागपूरचं असल्याचं समजतंय.
‘दहा हजार रुपये द्या आणि सात महिन्यांत २४ हजार रुपये घेऊन जा...` अशी बतावणी करून उल्हास प्रभाकर खैरे आणि त्याच्या पत्नीनं अनेक जणांना गंडा घातला. खैरे दांपत्यानं स्थापन केलेल्या कंपनीनं १० हजार भरले तर पुढचे सात महिने प्रत्येकी दोन हजार व्याज आणि सात महिन्यांनंतर १० हजार म्हणजेच प्रत्येक महिन्याला २० टक्के नफा गुंतवणूकदारांना देण्याचा दावा केला होता. आर्थिक गुन्हे शाखेनं उल्हास खैरे आणि त्यांच्या पत्नीला अटक केली असून त्यांच्यावर ५०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जॉईंट सीपी संदीप गोयल यांनी दिलीय.
२००९ साली ‘स्टॉक गुरू’ या नावानं त्यांनी कंपनी उघडली आणि सुरुवातीचे काही महिने त्यांनी लोकांचे पैसे परत दिलेही. पण, त्यानंतर ज्यावेळी कोटींची संपत्ती त्यांनी जमवली तेव्हा मात्र ते परदेशी पळून गेले. दोन लाख लोकांना त्यांनी फसवलं असावं, असा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली पोलीस खैरे पती-पत्नीची चौकशी करत असून त्यांच्याकडून या फसवणुकीची माहिती घेतली जातेय. पण, ज्यांची आयुष्याची कमाई गेलीय त्यांचं काय? हा प्रश्न मात्र कायम आहे.