नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. जम्मू आणि काश्मीर संबंधी कोणीही आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नये, असे ते म्हणाले आहेत.
पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद नफीज सईद झकारीया यांनी जेएनयू वादाबद्दल बोलताना "अफजल गुरुला अन्यायकारक पद्धतीने दिलेली फाशी काश्मिरातील जनतेने कधीही मान्य केलेली नाही," असे म्हटले होते. त्याच्याही पुढे जाऊन "काश्मीर खोऱ्यातील जनतेवर होणाऱ्या अत्याचारांविषयी पाकिस्तानने नेहमीच आवाज उठवला आहे," असे वक्तव्य केले होते.
यालाच उत्तर देताना विकास स्वरुप यांनी पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. "जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागातील प्रत्येक घटना हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तानने त्याविषयी दिलेले अनाहत सल्ले आम्हाला कधीही मान्य असणार नाहीत," या शब्दांत त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे.