नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेमध्ये मंगळवारी घेण्यात आलेल्या बहुमत ठरावामध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने बाजी मारली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय.
६१ पैकी ३३ आमदारांनी मतदान केले आहे. या चाचणीचा निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या निकालानंतर लगेचच केंद्र सरकारने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात येईल, असे न्यायालयात सांगितले. हरिश रावत यांच्या सरकारने बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात येईल, असे केंद्र सरकारचे महाधिवक्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. बहुमत चाचणीनंतर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते. केंद्रातील सरकारने आता या छोटय़ा राज्याच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केलेय.
मोदी सरकारने २८ मार्चला उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काँग्रेसने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर तेथील राष्ट्रपती राजवट उच्च न्यायालयाने रद्द करून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता, त्यातच काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांची अपात्रतेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती; त्यामुळे बहुमत सिद्धतेत काँग्रेसची बाजू वरचढ ठरली होती.