हैदराबाद : 'अल कायदा' या दहशवादी संघटनेत सहभागी व्हायला निघालेल्या महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक करण्यात आलीय. उमरखेड आणि हिंगोली इथले रहिवासी असलेल्या या दोन तरुणांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आलीय.
धक्कादायक म्हणजे, सोशल वेबसाईटद्वारे हे तरुण दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याचं उघड झालंय. उमरखेडमधील 25 वर्षांचा व्यावसायिक शहा मुदासीर उर्फ तल्हा आणि हिंगोलीत राहणारा 24 वर्षांचा शोएब अहमद खान उर्फ तारिकभाई हे दोघे जण काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तरुणांशी संपर्कात आले होते.
मुदासीर हा सिमीशी संलग्न असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन मायनोरिटी स्टुडंट या संघटनेचा सदस्य होता. तर शोएब हा इंडियन मुजाहिदीनशी संबंधीत संघटनेचा सदस्य होता. इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या अफगाणमधील तरुणाने या दोघांना अफगाणमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी बोलावलं होतं. तर पाकिस्तानमधील तरुणाने या दोघांना स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या साधनांपासून बाम्ब कसा तयार करता येईल, यासंदर्भातील माहिती पुरवली होती. अफगाण व पाकमधील तरुणाच्या माध्यमातून मुदासीर व शोएब हे दोघे हैद्राबादमधील मोथासिम बिल्लाहच्याही संपर्कात आले होते.
सोशल वेबसाईट फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. मोथासिमने या दोघांना अफगाणला अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन इस्लामी देश बनवण्याचे प्रशिक्षण घ्या, असं सांगून आर्थिक मदत करायची तयारीही दर्शवली होती.
हैद्राबादमध्ये मोथासिमला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलीस चौकशीत या नेटवर्कविषयीची नेमकी माहिती उघड होईल, असे हैद्राबाद पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून जिहादविषयीचे लेख, पासपोर्ट, दहशतवादी प्रशिक्षणाची सीडी व रोख रक्कम जप्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.