www.24taas.com, ढाका
१९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात अमानुषतेचा कळस गाठणार्याच पाकिस्तानी सैनिकांनी सुमारे साडेचार लाख बांगलादेशी महिलांवर बलात्कार केल्याची माहिती एका विशेष अभ्यासात उघड झाली आहे.
या युद्धात मार्च १९७१मध्ये १८,५२७, एप्रिलमध्ये ३५ हजार, मेमध्ये ३२ हजार, जूनमध्ये २५ हजार, जुलैमध्ये २१ हजार, ऑगस्टमध्ये १२ हजार, सप्टेंबरमध्ये १५ हजार, ऑक्टोबरमध्ये १९ हजार, नोव्हेंबरमध्ये १४ हजार, तर डिसेंबरमध्ये ११ हजार बांगलादेशी महिला पाकिस्तानी सैनिकांच्या जुलुमाला बळी पडल्या.
बांगलादेशच्या ४२ जिल्ह्यांतील ४५ पोलीस स्थानकांचा सर्व्हे आम्ही केला. शिवाय २६७ लोकांच्या मुलाखतीही आपण घेतल्या. या मुलाखतींत उघड झालेल्या तपशीलानुसार सुमारे ४ लाख ५० हजार बांगलादेशी महिला या अत्याचाराच्या बळी ठरल्या. त्यात ५६.५० टक्के मुस्लिम, ४१.४४ टक्के हिंदू, तर २.०६ टक्के अन्य धर्मांच्या महिला आहेत. अत्याचारित महिलांपैकी ६६ टक्के महिला विवाहित होत्या.
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाकिस्तान युद्ध संपले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ३० लाख बांगलादेशी नागरिकांची कत्तल केल्याचे उघड झाले, असे बांगलादेश युद्धाच्या संदर्भातील संसदीय स्थायी समितीचे संयोजक डॉ. एम. हसन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले.