ww.24taas.com,बर्लिन
फोक्सवॅगन समूहाने भारतामध्ये ७००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोक्सवॅगन येत्या दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहे.
गाड्यांच्या विक्रीमधील वाढ, नव्या मॉडेलची निर्मिती आणि यंत्रसामग्रीतील सुधारणेसाठी ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
फोक्सवॅगन समूहाने यापूर्वीही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट परताव्याच्या धोरणामुळे हा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. या प्रस्तावाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची महाराष्ट्र सरकारसोबत अजूनही बोलणी सुरु असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या गाड्यांच्या मॉडेलमध्येही थोडा बदल करायचा आहे. याशिवाय विक्रीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने ७००कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा कंपनीने निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात कंपनीला भारतामध्ये चांगला प्रतिसाद लाभला असून, १० ते १५ टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे.