www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता. पाकिस्ताननं लष्कर ए तोयबा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांना समर्थन देणं बंद केलं तर अमेरिका काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी भारतावर दबाव टाकेल, असा हा प्रस्ताव होता. परंतु, पाकिस्ताननं हा प्रस्ताव धुडकावून लावला होता.
पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी ‘मॅग्निफिसेंट डेल्यूजन्स’ या आपल्या पुस्तकात हा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार ११ नोव्हेंबर २००९ रोजी ओबामांनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एक ‘सिक्रेट पत्र’ लिहिलं होतं. हे पत्र ‘नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायझर’ जेम्स जॉन्स यांनी स्वत: येऊन झरदारी यांच्याकडे सोपवलं होतं. हक्कानी यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे या पत्रात ओबामांनी पाकिस्तानसमोर दीर्घकाळासाठी पार्टनर बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अल कायदा, तहरिक ए तालिबान, लष्कर ए तोयबा, हक्कानी नेटवर्क, अफगान तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांच्या संघटनांविरुद्ध सहयोगाची मागणी यावेळी अमेरिकेनं केली होती. एक चिठ्ठी पाठवून झरदारी यांनी या पत्राला उत्तर देखील दिलं होतं.
हक्कानी यांनी पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, याचं उत्तर म्हणून झरदारी यांनी पाठवलेल्या चिठ्ठीत भारत आणि अफगानिस्तानकडून जुन्याच धोक्यांचा उल्लेख केला गेला. या चिठ्ठीचा मसूदा परदेश आणि आएसआयच्या अधिकाऱ्यांनी तयार केला होता, हे स्पष्ट आहे. कारण, या चिठ्ठिसोबत पाकचे आर्मी चीफ अशफाक कयानी यांनी जेम्स जॉन्स यांना ५० पानांचा आपला एक प्रबंधही पाठवला होता. या प्रबंधात पाकिस्तानच्या हिताच्या आणि धोक्याच्या काही गोष्टींचा उल्लेख होता.
हक्कानी यांनी केलेल्या दाव्यानुसार, मी हे पत्र वाचलं तेव्हा मला वाटलं की माजी राष्ट्रपती अयूब खान यांनी राष्ट्रपती आयसेनहावर यांना १९५९ मध्ये जो कागद पाठवला होता त्यातही अशाच काही गोष्टींचा उल्लेख होता. याचाच अर्थ असाही होतोय की अर्धशतक पूर्ण झाल्यानंतरही पाकिस्तानच्या स्थितीत थोडाफारही बदल झालेला नाही.
पाकनं दहशतवादाच्या विरुद्ध सहयोग दर्शविला तर काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जाईल, असंही ओबामी यांनी झरदारींना या पत्रात म्हटलं होतं. पण, पाकिस्ताननं आपल्यासाठी अगोदरपेक्षा जास्त फायदेशीर ठरणाऱ्या अटींवर एका ‘सुपरपॉवर’चा पार्टनर बनण्याची संधी गमावली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.