www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया
जगविख्यात अभिनेता पॉल वॉकर याचं कार अपघातात निधन झालंय. ‘फास्ट अॅन्ड फ्युरियस’ मुव्ही सीरीजच्या या चेहऱ्यानं साऱ्या जगात ‘सुपरफास्ट’ गाडी चालवत भन्नाट वेगाची क्रेझ निर्माण केली होती.
‘लॉस एन्जेलिस’मध्ये झालेल्या कार अपघातात पॉलचा मृत्यू झालाय. मृत्यूसमयी पॉल ४० वर्षांचा होता. अमेरिकन वेळेनुसार शनिवारी दुपारी झालेल्या या अपघातात पॉलसोबत आणखी एक जण ठार झालाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोर्श’ या गाडीमधून पॉल आणि त्याचा आणखी एक मित्र ‘रिच आऊट वर्ल्ड वाईड’ या सामाजिक संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी निघाले होते. पण, काही कारणास्तव गाडीच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी समोर आलेल्या एका विजेच्या खांबाला आणि झाडाला जाऊन धडकली. त्याचा परिणाम म्हणून गाडीनं ताबडतोब पेट घेतला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय.
‘फास्ट अॅन्ड फ्युरिअस’च्या नवीन म्हणजेच सातव्या भागाच्या शूटींगमध्ये पॉल सध्या व्यस्त होता. पॉलला, आपल्या आधीच्या गर्लफ्रेंड रिबेका मॅकब्रेनबरोबर, मॅडो रेन ही १५ वर्षांची मुलगी आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.