www.24taas.com, इस्लामाबाद
दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय. काही ठिकाणी मतदानाची वेळ वाढवण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये २४ जण ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत.
तालिबान्यांनी मतदान केंद्रांवर आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली असतानाही मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी गर्दी केली होती. पाकिस्तानाच्या ६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकतांत्रिक पद्धतीनं सत्ता हस्तांतरण होतंय. वेगवेगळ्या मतदान केंद्रांचा दौरा केल्यानंतर मतदानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त फखरुद्दीन इब्राहीम यांनी म्हटलंय. मतदानासाठी महिलाही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
देशाची औद्योगिक राजधानी कराचीमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये १३ जण ठार झालेत तर ४० हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यांची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही.
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पक्षांमध्ये सत्तेसाठी मुख्य चुरस आहे. पाकिस्तानच्या ६६ वर्षाच्या इतिहासात प्रथमच नागरी सरकार पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या दुसऱ्या सरकारच्या हाती सत्तेची सूत्रे सोपविणार आहे. यापूर्वीची पाकिस्तानातील लोकशाही सरकारे कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच लष्कराने आपेल विशेषाधिकार वापरुन बर्खास्त केल्याचा इतिहास आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.