www.24taas.com, झी मीडिया, रियाद
चोरी केली तर हात छाटतात.... आता खून केला तर मुंडकं छाटतात.... सौदी अरेबियातील नागरीकाचा खून केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एका भारतीयाचे गुरुवारी मुंडके छाटण्याचे धक्कादायक आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले.
भारतातील मोहम्मद लतिफ (२८) हा तरूण काही वर्षापूर्वी सौदा अरेबियात नोकरी करण्यासाठी गेला होता. तेथे एका कारखान्यात काम करत असताना तेथील स्थानिक रहिवासी धफिर अल दुस्सारी याच्याशी मैत्री झाली. मैत्रीमुळे दोघांनी एकमेकांना पैसे दिले. दोन वर्षापूर्वी धफिर याने लतिफकडून पैसे (आठ हजार ५०० दिरहम) उधार घेतले होते. मात्र नंतर धफिर पैसे न देता तो लतिफला टोलवाटोलवी करु लागला.
यामुळे संतापलेल्या लतिफने रागाच्या भरात धफिरला लोखंडी सळीने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सौदा अरेबियाच्या पोलिसांनी लतिफला अटक केली. प्रत्यक्षदर्शी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे लतिफ दोषी असल्याचे निष्पन्न झाले असता स्थानिक न्यायालयाने तेथील कायद्यानुसार लतिफचे मुंडके छाटण्याचे आदेश दिले.
यापूर्वी २००९ मध्ये दोन श्रीलंकेचे नागरीक आणि एक भारतीय नागरिक मोहम्मद नौशाद याचे मुंडके छाटले होते. त्यांनी तेथील एका घरावर दरोडा टाकून एका महिलेची हत्या केली होती. नौशाद केरळचा रहिवाशी होता.
सौदी अरेबियासह अन्य मुस्लिम राष्ट्रांमध्ये हत्या, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आरोपीला कोणतीही दयामाया न दाखवता त्यांचे मुंडके छाटण्याची शिक्षा दिली जाते. स्वधर्मत्याग, सशस्त्र दरोडा आणि मादक द्रव्यांच्या तस्करी प्रकरणात तेथे मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.