मुंबई : अवघ्या फिल्म जगताचं लक्ष वेधून घेणा-या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठीचा डंका वाजणार आहे. कान्समध्ये राज्य सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट पाठवण्यात येणार आहे.
यंदा राष्ट्रीय पुरस्कारांकडे आशा लावून बसलेल्या अनेक बड्या फिल्ममेकर्सची साफ निराशा झाली. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट अशा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांची काही अपवाद वगळता राष्ट्रीय पुरस्कारासाठी मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. यावर काहीप्रमाणात टीकाही झाली. मात्र मराठीचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी आणखी एक नवी संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलीये.
11 ते 22 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. यात तीन सर्वोत्कृष्ट चित्रपट पाठवण्यात येणारेत. यामध्ये नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, रंगापतंगा, हलाल, कौल, दि सायलेन्स, वक्रतुण्ड महाकाय अशा काही फिल्म्सचं स्क्रीनिंग नुकतंच मुंबईतल्या पु.ल. देशपांडे अकादमीतील मिनी थिएटरमध्ये करण्यात आलं. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, मराठी चित्रपटांचा आशय आणि संहिता जगभरातील सिनेप्रेमींपुढे यावा म्हणून हा प्रयत्न होत असल्याचं सांगण्यात आलंय. आता कान्स फेस्टिव्हलसाठी कोणत्या अंतिम तीन चित्रपटांची निवड होते याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.