मुंबई : सर्वांचा लाडका अॅक्शन हिरो जॅकी चॅन आता एका बॉलिवूड गाण्यावर थिरकणार आहे. भारत आणि चीन यांच्यासंबंधी हा चित्रपट असणार आहे.
या गाण्यात जॅकी चॅन, सोनू सूद, दिशा पटाणी आणि अमायरा दस्तूरही असणार आहेत. मुख्य म्हणजे या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खान करणार आहेत. डीएनए वृत्तपत्रात याविषयी बातमी आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'पहिल्यांदाच जॅकी चॅनच्या एका चित्रपटात एखादे गाणे असणार आहे. सोनूने असं करण्याची विनंती जॅकीला केली होती. सोनूनेच जॅकीला या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची जबाबदारी फराहला देण्याची कल्पना दिली होती. या भव्यदिव्य गाण्याचे चित्रीकरण भारत आणि चीन अशा दोन्ही ठिकाणी होणार आहे. भारतीयांना चित्रपटात गाणी असणे आवडते असे जॅकीला कोणीतरी सांगितल्याने तो हे गाणे करणार आहे.'
'एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो भारतात येणार आहे. हे गाणे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल. या गाण्यात भारत आणि चीन या दोन्ही देशातील नृत्य कलाकार असणार आहेत. जोधपूर पॅलेस या जगप्रसिद्ध ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण होणार आहे. त्यानंतर ते बीजींगला जातील,' असेही सूत्रांनी सांगितले.
फराह खानने याआधी २००५ साली 'परहॅप्स लव्ह' या सांगीतिक चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केले होते.