मुंबई : राजकारण आणि बॉलिवूड... तसं पाहिलं तर ही दोन्ही क्षेत्रांची टोकं वेगवेगळी... अनेक कलाकार राजकारणात येतात तसेच काही राजकारणी सिनेमासृष्टीत येत आहेत. आता त्याता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचीही भर पडलीय... सिब्बल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
'शोरगुल' या चित्रपटातील गीत लेखन कपिल सिब्बल यांनी केलंय. सिब्बल यांनी या चित्रपटासाठी ‘तू ही तू’ ही कव्वाली लिहिली असून सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग हे गाणं गाणार आहे. सुप्रसिद्ध झितारवादक (गिटार आणि सतारपासून तयार केलेले वाद्य) निलाद्रीकुमार यांनी या गाण्याला संगीत दिलंय.
निलाद्रीकुमार यांच्याच आग्रहाखातर सिब्बल यांनी आणखी एका चित्रपटासाठी ‘तेरे बिना’ हे गाणे लिहिलं आहे. हा चित्रपट राजकीय विषयावर आधारित आहे. 'तेरे बिना' हे गाणे नक्कीच सर्वांना आवडेल असा विश्वास कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलाय. या गाण्यावर तुर्की मॉडेल थिरकताना दिसणार आहे.
निलाद्रीकुमार यांच्यासोबत या गाण्यावर जवळपास नऊ महिने काम केल्याचं सिब्बल सांगतात.