मुंबई : १४ दिवसांच्या सुट्टीवर तुरुंगातून बाहेर आलेल्या अभिनेता संजय दत्त याच्यासाठी 'पीके'च्या टीमनं एका विशेष स्क्रिनिंगचं आयोजन केलंय.
५५ वर्षीय अभिनेता संजय दत्तला ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'पीके' या सिनेमात संजय दत्त यानंही एक महत्त्वाची भूमिका बजावलीय.
आपल्या सिनेमांची कामं संपवून नंतर शिक्षा भोगण्यासाठी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन करणाऱ्या संजयनं याआधी सिनेमातील कोणताही भाग पाहिलेला नाही.... तसंच तो कुठल्याही प्रमोशनल इव्हेंटलाही उपस्थित राहू शकला नाही.... त्यामुळेच, सुट्टीवर आलेल्या संजयनं बाकीच्या सहकलाकारांबरोबर हा सिनेमा पाहावा, यासाठी हे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आल्याचं सिनेमाच्या प्रोडक्शन टीमनं म्हटलंय.
सांताक्रूझच्या एका प्रिव्ह्यू थिएटरमध्ये हे स्पेशल स्क्रिनिंग पार पडणार आहे. आमिर खान, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झालाय.
संजय दत्त याला मुंबई बॉम्बस्फोटात अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी २०१३ मध्ये दोषी ठरवलं गेलं होतं. त्यानंतर तो पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.