मुंबई : विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने, प्रत्येक पक्षातील बंडोबांना थंडोबा करण्याची आज शेवटची संधी आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, मतांची विभागणी वाढली आहे. यात बंडोबांना लॉटरी लागण्याची अपेक्षा वाढल्याने, बंडोबा पक्षातील वरिष्ठांच्या विनंतीला मान देण्यास तयार होतांना दिसत नाहीत.
आघाडी आणि युती तुटल्याने बंड करून अपक्ष लढवणाऱ्यांच्या अपेक्षा उलट आणखी उंचावल्या आहेत. अर्ज मागे घेण्याचं नाव न घेता, पुढील प्रचाराची मोर्चे बांधणी उमेदवारांनी सुरू केली आहे.
मात्र जागा वाचवण्यासाठी पक्षातील नेत्यांनी काही बंडोबांना भावनिक आवाहन केलं आहे, त्या बदल्यात पदांचं गाजर देऊ केल्याने काही ठिकाणी बंडाची वाट सोडून उमेदवार पक्ष प्रचारासाठी एकजुटीने काम करण्याच्या तयारीला लागली असल्याचीही उदाहरणं आहेत.
युती आणि आघाडी असल्याने अनेक वर्षांपासून दबून असलेल्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्या कामाची चुणूक दाखवण्याची संधी लाभली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.