नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसचं या निवडणुकीत पूर्णपणे पानिपत झालंय. भाजपनं यंदा दुप्पटीपेक्षा जास्त जिंकल्यात...
२०१४ ची विधानसभा निवडणूक सर्वच बाबतीत अभूतपूर्व ठरली. युती आणि आघाडी तुटल्यामुळे वेगवेगळे लढणाऱ्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला आपली ताकद ओळखण्याची संधी मिळाली. विदर्भात भाजपनं काँग्रेसचं पानिपत करत दुप्पटीपेक्षा अधिक जागा जिंकल्यायत.
विदर्भात पक्षाचे संघटनात्मक नेटवर्क असल्याचा फायदा भाजपला मिळालाच पण लोकसभा निवडणुकीप्रमाणं मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकला. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजपला मिळाला असला तरीही विधानसभेत मोदी लाटेपेक्षा भाजप लाट पहायला मिळाल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत.
एकीकडे या निवडणुकीकरता भाजपने नियोजन करत पूर्णपणे सज्जता ठेवली असताना, दुसरीकडे मात्र काँग्रेस या निवडणुकीबद्दल गंभीर तरी होता का? हा प्रश्न पडला असल्याचे मत या निरीक्षकांनी मांडले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या अतिशय कमी सभा झाल्याने पक्षाचा हवा तसा प्रभाव पडला नाही.
शिवाय विदर्भातील नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस किवा सुधीर मुनगंटीवार यांपैकी एक राज्याचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे पक्षातर्फे दर्शवण्यात आल्याने त्याचा फायदादेखील पक्षला झाल्याचं जाणकार म्हणत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे प्रचार सभा झाल्या होत्या पण दोन्ही मतदार संघातील उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे या निवडणुकीत विदर्भात मोदींचं मॅजिक कामी आलं की भाजपचे नियोजन? हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण काहीही असले तरी एक मात्र खरे की २००९ च्या निवडणुकीत महायुतीचा भाग असताना जेम-तेम १९ जागा मिळणाऱ्या भाजपने या वेळेला दुपटीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत काँग्रेसची चांगलीच धोबीपछाड दिली, हे तितकेच खरं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.