रायगड : निवडणुकीत मतदारांना आश्वासनं देण्याबरोबरच चकवा देण्यातही रायगडातील राजकीय पक्ष आणि पुढारी मागे नाहीत. रायगडमधील निवडणुकीच्या राजकारणातील सारख्याच नावाचा फंडा यंदाच्या निवडणुकीतही वापरला जातोय.
अलिबाग विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांच्या नावाशी साधर्म्य असलेला एक उमेदवार उभा आहे. तर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दुसरे महेंद्र दळवीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापचे सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांच्या नावाचेच दोन उमेदवार उभे आहेत. हा प्रयोग पनवेलमध्ये शेकापचे बाळाराम पाटील, भाजपाचे प्रशांत ठाकूर यांच्याबाबतीतही करण्यात आलाय. उरणमध्येही प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात आहेत.
मतदारांना चकवण्याबरोबरच विरोधी उमेदवारांची मतं कमी करण्याची ही ‘सेम नेम पॉलिसी’ रायगडकरांना नवीन नाही. शेकापचे अॅड. दत्ता पाटील यांच्याविरोधात ही प्रथम वापरण्यात आली होती.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याविरोधात त्याच नावाचा दुसरा उमेदवार उभा करण्यात आला होता. त्याला जवळपास दहा हजार मते मिळाली. आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. रायगडच्या राजकारणातील हा रडीचा डाव अद्याप तरी अन्य जिल्ह्यांनी स्वीकारलेला दिसत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.