Saif Ali Khan Attack News Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा दिवसांनंतर सैफ घरी परतला आहे. सैफ अली खान हल्लाप्रकरणी पोलिसांकडून सिनरिक्रिएट करण्यात आला. यावेळी आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनास्थळ समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मंगळवारी सकाळी सैफच्या घरी नेऊन संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. यावेळी आरोपीने तो सैफच्या घरात कसा शिरला आणि हल्ला कसा केला? याचा खुलासा केला आहे.
पोलिसांनी सुरुवातीला आरोपीला वांद्रे पोलिस ठाण्यात नेले, तिथे हल्ल्याच्या दिवशी तो सातच्या सुमारास पोहोचला होता. त्यानंतर नॅशनल कॉलेजजवळच्या बस स्टॉपवर पोहोचले. याच बसस्टॉपवर आरोपी काही तास झोपला होता. नंतर पोलिस आरोपीला घेऊन सैफच्या घरी पोहोचले होते.
आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबानुसार, तो शेजारी असलेल्या पेटफिना इमारतीतून सैफच्या इमारतीत शिरला. आधी तो इमारतीच्या बेसमेंटमध्ये गेला. त्यानंतक जिना चढून पहिल्या मजल्यावर गेला मात्र वर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावरील दरवाजा बंद होता. त्यामुळं त्याने आधी त्याचे बूट काढले आणि सैफ कुटुंबासोबत जिथे राहतो तिथे 11 व्या मजल्यावर जाण्यासाठी पाईपचा वापर केला.
सैफच्या घरात जवळपास 60 मिनिटांचा थरार सुरू होता. याबाबतही आरोपीने माहिती दिली आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, तो बाथरुमच्या खिडकीतून सैफच्या घरात शिरला आणि जेहच्या रुममध्ये शिरला. त्यावेळी जेहच्या खोलीत त्याची नॅनी एलियामा, फिलीप आणि जुनू हे होते. आरोपी जेहच्या दिशेने पुढे येत असाताना त्याची नॅनी एलियामाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला.
आरोपी घरात शिरल्याचे पाहून जुनूने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली आणि करिना-सैफला सावध करण्यासाठी बाहेर पळून गेली. त्यानंतर सैफ जेहच्या खोलीत आला आणि हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच झटापटीत सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार झाला. त्याचेवळी आणखी एक आया मदतीसाठी पुढे आली पण तिच्यावरही हल्ला झाला.
आरोपीचा दावा आहे की, सैफच्या कुटुंबाने त्याला जेहच्या खोलीत बंद केले. त्यानंतर घाबरून तो त्याच डक्टमधून बाहेर पडला आणि पाईपावरुन उतरून पायऱ्या उतरून खाली पळून गेला. पोलिसांनी क्राइम सीनचे रिक्रिएशन केल्यानंतर त्या 60 मिनिटांत काय काय घडलं हे समोर आलं आहे.