मुंबई: व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे.
मुंबर्ईतल्या पंतनगर पोलीस ठाणे हद्दीतल्या कामराज नगर भागातून २७ मे रोजी, सात वर्षांच्या रिया सुनील सिंगचं अपहरण झालं होतं. २६ वर्षांचा तरुण रियाला घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही कैद झालं होतं. या पुराव्यावरुन, पोलिसांनी व्हॉट्स अपचा वापर करुन अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या.
पंतनगर पोलिसांनी व्हॉट्स अपवरुन अपहरण करणाऱ्या तरुणाचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठवला. त्याआधारे ठाणे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं.
ठाणे शहर वाहतूक शाखेचे हवालदार जुबेर तांबोळी यांनी सुट्टीवर असतानाही रामबिलाल प्रजापती (२६, रा. घाटकोपर) याच्या ताब्यातून मुलीची सुटका करून त्यालाही मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. खासगी कामासाठी पुण्याला निघालेल्या तांबोळींनी बजावलेल्या कर्तव्याबद्दल पोलीस दलात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाहतूक उपशाखा कोपरी इथं नेमणुकीस असलेल्या तांबोळी यांची ३१ मे रोजी साप्ताहिक सुट्टी होती. त्याच दिवशी त्यांच्या मामेभावाचा पुण्यात साखरपुडा होता. त्यासाठी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास रेल्वेनं अंबरनाथ आणि तिथून नंतर नातेवाइकांसमवेत ते पुण्याला जाणार होते. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट-२ च्या पुलावर ते रेल्वेची वाट पाहत असताना त्यांच्या समोरून हे दोघंही जाताना दिसले. या दोघांनाही कुठेतरी पाहिल्यासारखं त्यांना जाणवल्यानं त्यांनी मोबाइल तपासला. त्यांच्या व्हॉट्सअॅपवर उपनिरीक्षक आर.के. सोनगिरे यांनी अपहरण झालेल्या रिया आणि रामबिलाल यांचा फोटो पाठविला होता.
फोटो आणि त्या दोघांमधील साम्य आढळल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळं तांबोळींनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याशी त्यानं झटापट केली. त्यांनी मदतीचं आवाहन करूनही कोणीही प्रवासी पुढं आला नाही. त्याला तसंच पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणि नंतर रेल्वे पोलीस ठाण्यात नेलं. रियाचे २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास कामराज मार्ग येथील प्रेमा किराणा स्टोअर्स इथून त्यानं अपहरण केलं होतं. त्याबाबतचा पंतनगरमध्ये गुन्हाही दाखल आहे.
प्रेमा किराणासमोरील सीसीटीव्हीमुळं व्हॉट्सअॅपवरून त्यांचा फोटोही पोलिसांकडून व्हायरल झाला होता. ठाण्यात मिळालेल्या रियाचा फोटो रेल्वे पोलिसांनी पंतनगर पोलिसांना व्हॉट्सअॅप केल्यावर ही तीच मुलगी असल्याची खात्री झाली आणि चिमुरडीची सुटका करून तिला पालकांकडे सोपविण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.