पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राज्य सरकारला टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या छायाचित्रांसह जाहिराती देऊन सामान्यांची फसवणूक करणाऱ्या मेपल ग्रुपचा संचालक सचिन अगरवाल हा 'अंडरवर्ल्डचा डॉन' आहे का?, जेणेकरून तो अजूनही हाती लागत नाही, भल्या मोठ्या जाहिराती छापून आल्यानंतर, राज्य सरकारनेच या ग्रुपवर कारवाई करायला हवी होती. ती का केली नाही', असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
'राज्यातील बहुतेक भागात भीषण दुष्काळ आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे, साधारणत: ऑक्टोबर महिन्यांतच पाण्याचे नियोजन करायला हवे. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. काही जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरही सरकारने केवळ उपाययोजनांचे नियोजन करीत आहे', असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.