अकोला : अकोल्यातील दाबकी या गावी अपघातानंतर झालेल्या जमावाच्या दगडफेकीची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या 'झी २४ तास'चे प्रतिनिधी जयेश जगड यांचा कॅमेराच पोलीस अधिक्षकांनी हिसकावून घेतल्याची घटना घडलीय.
चंद्रकिशोर मीना असं या पोलीस अधिक्षकांचं नाव आहे. जमावाने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीचा संताप पोलिसांनी माध्यम प्रतिनिधीवर काढला.
काल रात्री अकोल्याच्या भांडपूरा भागात तणाव निर्माण होवून प्रचंड दगडफेक सुरू होती. या घटनेचं नेमकं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांशी पोलीस अधीक्षक मीना यांनी एकेरी भाषा वापरत अतिशय अभद्र भाषेत शिवीगाळ केली.
'झी 24 तास'चे प्रतिनिधी जयेश जगड यांना शिवीगाळ करीत त्यांचा कॅमेराही हिसकावून घेतला. 'कॅमेरा न्यायला आता उद्या ये... मी तुम्हाला पत्रकारिता शिकवितो' असं म्हणत त्यांनी माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्नही केला.
आपल्या निष्क्रियतेची लक्तरे अकोल्यातील माध्यमे वेशीवर टांगत असल्यानेच चंद्रकिशोर मीना यांचा अकोल्यातील माध्यमांवर मोठा राग असावा. त्यामुळे आपली निष्क्रियता झाकण्यासाठी माध्यमांची मुस्कटदाबी करु पाहण्याचा अकोल्याच्या या एसपी करताना दिसले.
शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारित प्रचंड वाढ झाली असून घरफोडी, खून, खुलेआम सुरु असलेले अवैध धंदे यावर पोलिसांना नियंत्रण मिळविता आलेलं नाही. वारंवार माध्यमांनी जनतेसमोर सत्य परिस्थति मांडलीय. मात्र, आपला कर्तव्य बजावणाऱ्या माध्यमांची मुस्कटबाजी करण्याचा प्रयत्न राज्याचे गृह राज्य मंत्री डॉ. रंजित पाटिल यांच्या अकोल्यातील पोलीस अधिक्षकांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.