कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.
आघाडी सरकारने सिमी या संघटनेवर बंदी घातली होती. आता तुम्ही सनातनवर बंदी घातली पाहिजे. सरकारचा तपासावर दबाव आहे. या सरकारमध्ये कोणालाही लगेचच क्लीन चिट दिली जाते, अशी टिका विखे-पाटील यांनी केली.
सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांना या हत्याप्रकरणी प्रायच्छित घ्यायचे असेल तर, पाटील यांनीच सनातनच्या बंदीचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेय.
दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी स्पष्ट केले. दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय.
तांत्रिक कारणास्तव गायकवाड याला अटक झालेली आहे; मात्र त्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सचिन सावंत अशा व्यक्ती सनातनवर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत. पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण केला गेल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.