श्रीगोंदे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.
राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या विस्तारात घटक पक्षांचा समावेश केला नाही, तर आमदारकीचा राजीनामा देऊ. आम्हाला विचारातच घेतले जाणार नसेल, तर महायुतीत न राहता बाहेर पडण्याचाही निर्णय होईल, असे स्पष्ट संकेत महादेव जानकर यांनी फडणवीस सरकारला दिले आहेत.
आपण मंत्रिपदासाठी लाचार नाही. पण राष्ट्रीय समाज पक्षासह इतर मित्रपक्षांना भारतीय जनता पक्षाने सत्तेत सन्मानाने सामावून घ्यायला हवे. आमचा केवळ निवडणुकीपुरता वापर करण्याचे धोरण त्यांनाच महागात पडेल, असा सूचक इशारा जानकर यांनी दिलाय. भाजपने आपली चूक सुधारली नाही, तर काही दिवसांत भाजपवर राष्ट्रवादीप्रमाणे वेळ येईल, असे जानकर पत्रकार परिषदेत म्हणालेत.
आम्हाला विचारात घेणार नसाल तर महायुतीत राहण्याची काहीएक गरज नाही. तसचे मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना सामावून घेतले नाही, तर आपण विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीमाना देऊ. भाजपला आमची गरज नसेल, तर महायुतीत राहण्याचेही काही कारण नाही. सहकारी पक्षांशी चर्चा करून महायुतीतूनही बाहेर पडू. मी मंत्री झालो, तर या सरकारमधील 'दबंग मंत्री' बनून दाखवीन, असा दावा त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीकडून फसवणूक
राष्ट्रवादीचे नेते धनगर समाजाच्या आरक्षणावरून जनतेची दिशाभूल करुन फसवणूक करीत आहेत. आघाडी सरकारने केंद्राकडे व्यवस्थित पाठपुरावा केला नसल्यानेच आरक्षण रखडले, असा आरोपत जानकर यांनी यावेळी केला.
आम्हाला राखीव जागा हव्यातच; पण त्यासाठी आदिवासी समाजावर भार नको ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मात्र, कारण वेगळेच दिले जात आहे. याआरक्षणाबाबत राष्ट्रवादी दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.