नागपूर : पत्नीकडून तुम्हाला वारंवार स्वत:च्या जीवाचं बरे-वाईट करून घेण्याच्या धमक्या मिळत असतील, सार्वजनिक ठिकाणी पत्नी तुमच्याशी भांडत असेल, आरडाओरड करून गर्दी गोळा करत असेल, तर असं वागणं आता क्रूरता ठरणार आहे. यासंदर्भातील एका प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्वाळा दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नी आत्महत्या करण्याची धमकी देत असेल, तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असं नागपूर खंडपीठाने म्हटलंय.
तसेच सार्वजनिक ठिकाणी पतीसोबत भांडणे, आरडाओरड करून गर्दी गोळा करणे, हासुद्धा क्रूरपणाच असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. एका जोडप्याच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी न्यायालयात आलेल्या प्रकरणावरून ही निरीक्षणे नोंदविण्यात आली.
या जोडप्याचा ७ सप्टेंबर १९९७ ला विवाह झाला ; मात्र महिनाभरातच खटके उडू लागले. पतीच्या याचिकेनुसार पत्नी त्याचा आणि कुटुंबीयांचा मानसिक छळ करायची. स्वयंपाकाचा कंटाळा, बाहेर फिरण्याला नकार, छोट्या-मोठ्या गोष्टींवरून रस्त्यावर मोठमोठ्याने ओरडणे आणि गर्दी गोळा करणे, असे प्रकार सुरू झाले.
विहिरीत उडी घेऊन जीव देण्याची धमकीही देऊ लागली. कायद्याची भीती दाखवीत ती अनेकदा विहिरीच्या कठड्यापर्यंत जायची, असेही पतीने नमूद केले. अंगावर रॉकेल ओतून पती आणि कुटुंबीयांना फौजदारी तक्रारीत अडकविण्याचा प्रयत्नही तिने केला.
अखेर सततच्या जाचाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. यात संपूर्ण कुटुंब दहशतीत असल्याचेही त्याने नमूद केले.
मात्र, सुनावणीदरम्यान, हुंड्यासाठी पती आणि कुटुंबीय त्रास देत असल्याचे पत्नीने कुटुंब न्यायालयात सांगितले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत कुटुंब न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देत त्याची विनंती मान्य केली.
याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीने भादंवि कलम 498 (अ) अंतर्गत केलेली खोटी तक्रार सिद्ध करण्यात पतीला यश आल्याचे न्या. वासंती नाईक आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या संयुक्तपीठाच्या निदर्शनास आले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींच्या संयुक्तपीठाने विवाह संपुष्टात येण्यासाठी सबळ अणि पुरेसे पुरावे असल्याचे नमूद केले. त्यामुळे कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणे अमान्य करीत पत्नीची याचिका फेटाळून लावली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.