नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी खमंग चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
गणेश नाईक यांनी आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी कार्यकर्त्यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी कामाला लागा, असे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशी तिरंगी लढत पाहावयास मिळेल.
विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर गणेश नाईक यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. आता नाईक यांच्या या भूमिकेमुळे दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता व संभ्रमावस्था दूर झालेय.
नाईक यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागणाला होता. नाईक यांनी पक्षांतराच्या प्रश्नावर दीड-दोन महिने मौन बाळगल्याने स्वपक्षातील कार्यकर्त्यांसह शिवसेना व भाजपाच्या गोटातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. निर्माण झालेल्या या राजकीय अनिश्चिततेवर नाईक यांनी पडदा पाडला.
आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर केल्याने पक्षातील निष्ठावंतांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र नाईक यांनी भूमिका मांडण्यास विलंब केल्याने महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची निवड करताना त्यांना कसरत करावी लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.