कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : जागतिक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडची ओळख अधोरेखित झाली ती हिंजवडी आयटी पार्कमुळे. पण या आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येने पुरतं ग्रासलंय. दररोज जवळपास ३ लाख लोक हिंजवडीला ये जा करतात, पण त्यांचा हा प्रवास म्हणजे नरक यातनाच आहे.
इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा आणि अश्या किती तरी मोठ्या आय टी कंपन्यांमुळं हिंजवडीची पर्यायानं पिंपरी चिंचवडची ओळख देशभरात झाली. या कंपन्यांत काम करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आय टी इंजिनिअर्स पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक झाले. पण सध्या हिंजवडीला पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणा-या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होतेय. अपुरे रस्ते, लाखोंच्या संख्येने वाहनं, वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, बेशिस्त वाहनस्वार यामुळे हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजलाय.
हिंजवडीमधली रस्ते पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्या नियंत्रण कक्षेत येतात. त्यांच्यात समन्वय नसल्यानं इथली समस्या जैसे थे आहे.
हिंजवडी मधली वाहतूक समस्या सध्या प्रचंड जटील झालीय, विविध उपाय योजना सांगितल्या जातात पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळं ही समस्या सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय...!