ठाणे : मनपा निवडणूकीच्या तोंडावर पक्षीय कोलांट्या उड्यांचं सत्र ठाण्यात सुरू झालं आहे. ठाण्यात प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या आकडेवारीच्या गणितात इन्कमिंगमध्ये शिवसेना आणि भाजप सर्वात वरच्या स्थानी आहे. तर राष्ट्रवादी संख्या निम्म्यावर आलीय. काँग्रेस आणि मनसेमध्ये मात्र नवे प्रवेश जवळपास नाहीसे झालेत.
ठाण्यात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचं चित्र यंदाच्या निवडणुकीत बघायला मिळतेय. पालिकेच्या मुंब्रा दिवा आणि शीळ डायघर भागात राष्ट्रवादीचे चांगले प्रस्थ आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी टिकवून ते ठेवलय. राष्ट्रवादीचे प्राबल्य पाहून यंदाच्या निवडणुकीत अनेक काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीकडे धाव घेतली आहे.
कुठे शिवसेना तर कुठे भाजपने आपले किल्ले उभारले आहेत. ठाणे मतदार संघातील नौपाडा, ब्राह्मण आळी, बी केबीन परिसरात मतदारांना भाजप आपलीशी वाटत असल्याने भाजपाची सरशी सेनेच्या डोक्याला ताप ठरणार आहे. तर वागळे इस्टेटच्या पट्ट्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे. एकंदरीत ठाण्यात शिवसेना-भाजप टॉप, राष्ट्रवादी हाफ,तर काँग्रेस-मनसे साफ, परिस्थिती सध्यातरी दिसतंय.