कोरेगाव : कोरेगाव नगरविकास कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काल पुकारलेल्या कोरेगाव बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या दीड महिन्यापासून कोरेगाव परिसरात वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणकडे वारंवार निवेदने करूनही काहीच मदत मिळालेली नाही.
महावितरणच्या सातारा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. वाय. देशपांडे व उपकार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी कोरेगावकरांना लेखी आश्वासान दिले होते. पण त्यानंतरही दिवसातून बराच काळ वीजपुरवठा खंडीत होत होता. त्यामुळे कोरेगावातील व्यावसायिक, व्यापारी, लघुउद्योजक आणि नागरिकांनी संप पुकारला. दुपारनंतर कोरेगावातील संघटनांचे प्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात सकारात्मक बैठक झाली. यापुढे शहारात वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. त्यानंतर बंद मागे घेण्यात आला.