पुणे : राजकीय पक्ष निवडणूक लढवत असले तरी, निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी झटत असतात. यात प्रामुख्याने पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांचं वर्चस्व दिसतं. पुण्यात मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची अवघड आणि जबाबदारीची कामगिरी पुण्यात महिला अधिका-यांच्या खांद्यावर आहे.
विधानसभेचे 21 मतदार संघ. जवळपास 65 लाख मतदार. 7 हजार 475 मतदान केंद्र आणि 45 हजार कर्मचारी आणि शकडो उमेदवार. विधानसभा निवडणुकीचा पुण्यातील हा अवाढव्य पसारा. निवडणुकीचा हा प्रचंड गाडा या महिला अधिकारी हाकत आहेत. निवडणुकीतलं असं कोणतंही काम नाही, जे या महिला अधिकारी करत नाहीत, मतदार नोंदणीपासून मतदान पार पडेपर्यंतची जबाबदारी या महिला अधिकारी पार पाडत आहेत. एवढी मोठी आणि अवघड जबाबदारी महिला अधिकारी पार पाडत असल्या तरी त्यांच्यावर कसलंही दडपण नाही.
कोणत्या आहेत जबाबदाऱ्या?
* 3 महिला उपजिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
* 6 महिला तहसीलदार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतायत.
* 11 महिला उप जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर म्हणून सांभाळतात.
* कर्मचा-यांचं प्रशिक्षण, एक खिडकी, आचारसहिंता कक्ष, पेड न्यूज अशा ठिकाणी समन्वय अधिकारी
* निवडणूक शाखेची तर संपूर्ण जबाबदारीच 4 महिला अधिका-यांवर आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत असा गोंधळ पुन्हा होणार नसल्याचा विश्वास या महिला अधिकारी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या कामाचं शिवधनुष्य पेलण्याचं अवघड काम या महिला अधिकारी अत्यंत सक्षमपणे पार पाडतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.