आयसीयूमध्ये त्यांनी बांधल्या सात जन्माच्या गाठी

लग्न म्हणजे मोठा सोहळा, नवरा नवरी थाटमाट, मंत्रोच्चार आणि नातेवाईकांकडून होणार कोडकौतुक अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात असते.

Updated: Dec 21, 2016, 10:41 AM IST
आयसीयूमध्ये त्यांनी बांधल्या सात जन्माच्या गाठी title=

पुणे : लग्न म्हणजे मोठा सोहळा, नवरा नवरी थाटमाट, मंत्रोच्चार आणि नातेवाईकांकडून होणार कोडकौतुक अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात असते, मात्र या सगळ्याला बाजूला सारत एक ह्रदयस्पर्शी विवाह आईसीयू मध्ये पार पडला आणि या लग्न सोहळ्याने उपस्थितांची मनं हेलावली.

हा विवाह होता ज्ञानेश देव आणि सुवर्णा कांगळे यांचा, खर तर सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणेच यांचं देखील लग्न 18 डिसेंबरला ठरलं होतं. मात्र एका बाजूला लग्नाची तयारी सुरु असताना दुसरीकडे ज्ञानेशच्या वडीलांना ह्रदयविकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आपल्या मुलाचं लग्न आपल्या डोळ्या देखत व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती दूसरीकडे त्यांची प्रकृतीही अत्यंत नाजूक बनली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी आईसीयूमध्ये विवाह करण्याचा निर्णय ज्ञानेश आणि त्याचा घरच्यांनी घेतला तर सुवर्णाच्या कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिली, त्यामुळे अत्यंत थाटात होणारा हा सोहळा अगदी साधेपणाने अगदी काही मिनीटांमध्ये दीनानाथ रुग्णालयातील आयसीयू मध्ये पार पडला, त्याचं दिवशी आणि त्याच मुहुर्तावर.

विवाहनंतर अगदी काही वेळातच ज्ञानेशचे वडील नंदकुमार देव यांची प्राणज्योत मालवली आणि देव कुटुंबीयांवर दुखाची लाट पसरली मात्र यामध्येही वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान ज्ञानेशला वाटतं. आयसीयू मध्ये लग्न करण्याची परवानगी दिल्याने रुग्णालयाचे देखील ते आभारी आहेत.

आयसीयूमध्ये लग्न होणं ही अगदी दुर्मिळ गोष्ट. ते होत असताना आयसीयूचे नियम पाळणही तितकचं महत्वपूर्ण ठरतं. मात्र देव कुटुंबीयांची इच्छा आणि मुलाचं लग्न पाहण्याची नंदकुमार देव यांची इच्छाशक्ती त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाने या लग्नाला परवानगी दिली... आणि कोणतेही नियम न मोडता हा विवाह पार पडला

आयसीयू म्हणजे रुग्णाच्या तब्येतीच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण अशी जागा. या ठिकाणी रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत असतात. त्यामुळे या ठिकाणी किंचीतही दुर्लक्ष होऊन दिल जात नाही. मात्र या ठिकाणी झालेल्या लग्नामुळे कोणालाही कसलाही त्रास झाला नाही मात्र नंदकुमार देव यांची शेवटची इच्छा मात्र पूर्ण झाली.